५ हजारांची लाच घेणारा अंमलदार एसीबीच्या जाळ्यात

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, त्यातील ५ हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार सुभाष छगन राठोड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.८) सायंकाळी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बाळासाहेब पासलकर यांचाही सहभाग निष्पन्न झाला.
तक्रारदार महिलेचा मुलगा खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात सध्या कारागृहात आहे.
या प्रकरणातील दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची मागणी केली होती. महिलेला पैसे देण्याची इच्छा नसल्याने तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, तपास अंमलदार राठोडने तडजोडीनंतर पाच हजार
रुपये आधी आणि उर्वरित पाच हजार रुपये नंतर घेण्याचे ठरवले.
बुधवारी सायंकाळी मुकुंदवाडी ठाण्याच्या आवारात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच अंमलदार राठोड याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र शिनकर, साईनाथ तोडकर आणि पथकाने केली. दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून रात्री एकपासून त्यांच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू होती.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions